पालघर जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत शाळा सुरु होणार नाहीत! जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचा निर्णय

0
2589

दि. 23 नोव्हेंबर: पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी शासनाच्या 9 वी ते 12 वी वर्गाच्या शाळा सुरु करणेबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वसई विरार शहर महापालिकेचे आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये, बोईसर तारापूर उद्योग क्षेत्रामध्ये व 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये 31 डिसेंबर पर्यंत शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील शाळांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 30 नोव्हेंबर पर्यत संमती पत्र घ्यावे व त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीने शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. निवासी आश्रम शाळा, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय, समाज कल्याण विभागाअंतर्गत वसतिगृहे व इतर निवासी शाळा ह्या सुरु करणेबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाणार आहे.

शाळा सुरु करणेबाबत अन्य सूचना पुढील प्रमाणे आहेत:-

  • शिक्षकांनी स्वत:ची राहण्याची व्यवस्था ते ज्या गावात शाळेवर नियुक्त आहेत त्या गावातच करावी.
  • ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार असतील तेथील शिक्षकांनी नजीकच्या आरोग्य उपकेंद्र अथवा कोव्हीड केअर सेंटर येथे RTPCR चाचणी करावी.
  • ज्या शिक्षक / कर्मचारी यांना यापुर्वीच कोरोना झाला आहे त्यांनी तृर्त चाचणी करण्याची आवश्यकता नाही.
  • लक्षणे असलेल्या शिक्षकांनी Antigen चाचणी करावी व चाचणी नकारात्मक आल्यास RTPCR चाचणी करावी.
  • ज्या गावात कोविड-१९ चा एकही रुग्ण नाही तेथे शाळा सुरु करण्यात यावी.
  • E-learning सुविधा नसलेल्या ठिकाणी व Mobile Network अडचणी असलेल्या ठिकाणी शाळा प्राधान्याने सुरु कराव्यात. तथापि सदर क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्रात असल्यास शाळा सुरु करु नयेत.
  • पालकांनी विद्यार्थी/विद्यार्थीनी आजारी असल्यास त्यास/तीस शाळेत पाठवू नये.
  • परिस्थितीनुसार शाळेच्या मोकळया पटांगणात शाळा भरविण्याचा प्रयत्न करावा.
  • शाळा व्यवस्थापन समितीने पालक शिक्षक संघास (PTA) विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा.