पालघर, दि. 23 नोव्हेंबर: उंबरगांव (गुजरात) येथील निलेश उर्फ दिनेश चुनिलाल रावल (29) याचे अपहरण करुन खून केल्याप्रकरणी पालघर जिल्हा पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी 4 नोव्हेंबर रोजी निलेश हा तलासरी तालुक्यात व्यापाराच्या निमित्ताने आला असता त्याचा खून करुन मृतदेह गोणीत भरुन व गोणीला दगड बांधून धरणात टाकला होता.
4 नोव्हेंबर रोजी निलेश घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी शोध घेतला असता तलासरी उंबरगांव रस्त्यावर त्याची मोटारसायकल आढळली. मात्र तो न आढळून आल्याने 5 नोव्हेंबर रोजी तलासरी पोलीस स्टेशनमध्ये (मिसिंग रजिस्टर नं. 17/2020) हरवल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान 8 नोव्हेंबर रोजी मयत निलेशचा मृतदेह कुर्झे धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल करुन (नोंद क्र. 230/2020) तपास सुरु केला.
प्रस्तुत प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र नाईक यांच्या पथकाला यश आले असून त्यांनी 2 आरोपींची धरपकड केली आहे. आरोपी हे मयताचे परिचित असून त्यांनी व्यवहारातून हा खून केला किंवा लूटमार करण्याच्या हेतूने केला याबाबत तपास चालू आहे. पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती ओम्नी कार (जी.जे. 15 पी. पी. 4681) देखील जप्त केली आहे. आरोपींनी पाळत ठेवून मयताकडे लाख/दीड लाख रुपये मिळतील या हेतूने त्याला निर्जन ठिकाणी गाठले व त्याला लाकडी दांडूक्याने मारहाण करुन व्हॅन मध्ये बसवले. मयताने आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी त्याचा गळा दाबून ठार केले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कुर्झे धरणात टाकला. त्याच्याकडील 12 हजार रुपयांची रोकड देखील लुटली आहे.