करोना : जिल्ह्यात आतापर्यंत 91 हजार 561 जणांचे लसीकरण!

0
1999

लस सुरक्षित, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे! -जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ

पालघर, दि. 30 : कोव्हिड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर ग्रामीण तसेच वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीमध्ये काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व व्याधी असलेल्या व्यक्तींसह 75 हजार 728 जणांना कोव्हिडवरील लसीचा पहिला डोस देण्यात आला असून 15 हजार 833 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे एकुण जिल्ह्यामध्ये 91 हजार 561 व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे. हे लसीकरण पुर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले.

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लस जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. लसीकरण केंद्राची संख्या 61 असून त्यामध्ये पालघर ग्रामीणमध्ये 32 शासकीय लसीकरण केंद्र, तर 5 खाजगी लसीकरण केंद्रे आहेत. तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये 14 शासकीय तर 10 खाजगी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.

दरम्यान, 1 मार्च ते 28 मार्च दरम्यान जिल्ह्यामध्ये 3 हजार 677 नविन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.