पालघर, दि. 24 : जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल थोरात यांनी संबंधित यंत्रणेला केली आहे.
पालघर पंचायत समिती सभागृहात काल, 23 डिसेंबर रोजी पीसीपीएनडीटी व एमटीपी कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल थोरात व डॉ. राजेंद्र केळकर होते. तर सल्लागार समितीचे सदस्य डॉ. पोसम, डॉ. नारायणकर, श्रीम. वैराळे, तसेच वैद्यकिय अधिक्षक डॉ. मराड, डॉ. हेंगणे, डॉ. शंतनु, डॉ. वाणी, डॉ. विश्वकर्मा आदींची कार्यशाळेस उपस्थिती होती. यावेळी जिल्हा कायदा सल्लागार अॅड. सीमा साठे यांनी पीसीपीएनडीटी कायद्या संदर्भातील नियम, सोनोग्राफी व एमटीपी कशाप्रकारे तपासावे व रेकॉर्ड कसे जतन करावे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व अधिकार्यांनीही गर्भलिंग निदान व गर्भपाताबाबत मार्गदर्शन केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत रिपोर्टींग करणे, सर्व रेकॉर्ड कायदेशीर सांभाळून ठेवणे, प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा असुन असे कृत्य होताना आढळल्यास आपण 1800-233-4475 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.amchimulgi.com या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याचे तसेच शासनाला याबाबतची माहिती देणार्यास बक्षिस योजने अंतर्गत 1 लाखांपर्यंत बक्षीस देण्यात येईल, असे स्टिकर प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी लावण्याबाबत सुचना करण्यात आल्या. अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांनी जिल्ह्यातील भ्रुणहत्या टाळून लिंग गुणोत्तराच्या प्रमाणातील दरी कमी करण्यासाठी व मुलींचे प्रमाण जास्त असावे याकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच ही काळाची गरज असल्याचे सांगून पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना केल्या.