नगरपंचायत प्रशासनाविरोधात नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

0
2188

लाभार्थ्यांचे शौचालय अनुदान, रोहयो कामांचा थकित मोबदला, रस्त्यांवरील खड्डे आदींसह विविध प्रश्‍नांकडे वेधले लक्ष

प्रतिनिधी/वाडा, दि. 16 : नगरपंचायत क्षेत्रातील लाभार्थ्यांचे रखडलेले शौचालय अनुदान देणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे केलेल्या महिलांना त्यांचा थकित मोबदला देणे, रस्त्यांवरील खड्डे भरणे या प्रमुख मागण्यांसह शासनाच्या विविध योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासाठी वाडा नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांसोबत नगर पंचायत कार्यालयासमोर आज, सोमवारी (दि. 16) ठिय्या आंदोलन केले.

वाडा ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात स्वच्छ भारत योजनेअंतर्गत आताच्या वाडा नगर पंचायत क्षेत्रातील 107 लाभार्थ्यांना शौचालये मंजूर होऊन त्यांचे काम पूर्ण करण्यात आले होते. नंतर नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर या लाभार्थ्यांचे अनुदान नगर पंचायतीकडे वर्ग करण्यात आलेले असूनही वेळोवेळी मागणी करूनही आजपर्यंत हे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आलेले नाही. तसेच मार्च 2019 या महिन्यात सुमारे 80 महिलांना रोजगार हमी योजनेअंतर्गत नगर पंचायती मार्फत रोजगार देण्यात आला होता. मात्र या कामांचा मोबदलाही नगरपंचायत प्रशासनाने दिलेला नाही. त्यामुळे शौचालयाचे अनुदान व रोहयो अंतर्गत कामे केलेल्या महिलांना त्यांचा थकित मोबदला तत्काळ द्यावा, वारंवार मागणी करून देखील मोहोंड्याचा पाडा येथील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, ती तत्काळ करावी, तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, आदी मागण्यांसाठी नगरसेवक रामचंद्र भोईर, अरुण खुलात आणि नगरसेविका ऊर्मिला पाटील यांनी शेकडो नागरिकांसह नगर पंचायत कार्यालयाच्या प्रवेश द्वारासमोर ठिय्या आंदोलन केले.

आम्ही नगरसेवक म्हणून नगर पंचायत प्रशासनाकडे नागरिकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करत असतो. परंतु नगर पंचायत प्रशासन आम्हा नगरसेवकांना देखील थातुरमातूर उत्तरे देऊन वेळ काढूपणा करत असेल तर सामान्य नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाकडून काय अपेक्षा करावी? असा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे जो पर्यंत आमच्या मागण्यां संदर्भात ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तो पर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.
-रामचंद्र भोईर व अरुण खुलात, नगरसेवक, वाडा नगर पंचायत.

पंचायत समिती प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून लवकरच शौचालय अनुदान व कामाचा मोबदला मिळवून दिला जाईल.
-सागर साळुंखे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, वाडा.