दि. 13: डहाणू शहरात 10 दिवसांच्या लॉक डाऊननंतर कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आली आहे. 2 ऑगस्ट रोजी एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 222 होती. ती 11 दिवसानंतर आज सायंकाळी 301 वर पोहोचली आहे. 11 दिवसांत नवे 79 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले आहेत. 2 ऑगस्ट रोजी 119 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यातील 87 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते व 32 रुग्ण घरी राहून उपचार घेत होते. आज रोजी 116 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 98 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 18 जण घरी राहून उपचार घेत आहेत.
2 ऑगस्ट रोजी कोरोनाग्रस्तांशी निकटचा संपर्क आल्यामुळे विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 980 वर पोहोचली होती. आता ही संख्या 727 पर्यंत खाली आली आहे. कन्टेनमेंट झोन मात्र 2 ने वाढून 30 झाले आहेत.नवे निष्पन्न होणारे रुग्ण हे प्रामुख्याने आधीच पॉझिटीव्ह निष्पन्न झालेल्या रुग्णांच्या नजीकच्या सहवासातील आहेत. डहाणू शहारा व्यतिरिक्त उर्वरित तालुक्यातून 10 दिवसांत 47 नवे कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले असून ही आकडेवारी दिलासादायक आहे.
डहाणू तालुक्यात 10 दिवसांत मृत्यूचा आकडा 5 ने वाढून 13 वर पोहोचला आहे. त्यातील 2 मृत्यू डहाणू शहरातील असून शहरातील मृत्यूचा आकडा 8 झाला आहे.