दि. 14 ऑगस्ट: डहाणू तालुक्यातील बाजारपेठा व दुकानांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 31 जुलै रोजीच्या (मनाई आदेश/एस आर 39/20) आदेशान्वये अनुमती देण्यात आलेली आहे. मात्र डहाणू शहरात 4 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे वेळेतील बदल प्रत्यक्षात अंमलात येण्यास 14 ऑगस्टची प्रतिक्षा करावी लागली आहे. आजपासून डहाणू शहरातील बाजारपेठा सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान खुल्या ठेवण्यास अनुमती प्राप्त झाली आहे. संपूर्ण पालघर जिल्ह्यातील कन्टेन्मेन्ट झोन व लॉक डाऊन जाहीर केलेली क्षेत्रे वगळता अन्य क्षेत्रात नवे नियम लागू झाले आहेत.
पुन्हा लॉक डाऊनचा कुठलाही प्रस्ताव नाही: डहाणू शहरासाठी पुन्हा लॉक डाऊन होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. लोकांनी राजतंत्र कडे विचारणा केल्यानंतर पिंपळे यांच्याकडे खातरजमा केली असता पुन्हा लॉक डाऊन पुकारण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचा खुलासा डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी केला आहे. लोकांनी बाजारात एकाचवेळी अनावश्यक गर्दी करु नये व कोरोनापासून बचावासाठी सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे असे आवाहनही पिंपळे यांनी केले आहे.