सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ पालघरमध्ये भव्य रॅली

0
2087

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 30 : राष्ट्रीय नागरीकता नोंदणी (एनआरसी) व सुधारित नागरीकत्व कायद्या (सीएए) च्या समर्थनार्थ आज, सोमवारी पालघरमध्ये संविधान सन्मान मंचच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी सहभाग नोंदवला. सुमारे 30 हजार लोक तिरंगा घेऊन या रॅलीत सामिल झाले होते.

एनआरसी व सीएए कायदा संविधानविरोधी असल्याचे सांगत मागील काही दिवसांपासुन देशातील अनेक भागात याविरोधात मोर्चे काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे एनआरसी व सीएए कायदा देशहितासाठी आवश्यक असल्याचे सांगत याच्या समर्थनार्थ मोर्चे व रॅली काढण्यात येत आहेत. त्यानुसार आज पालघरमध्ये एनआरसी व सीएएच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हातात तिरंगा व विविध घोषणांचे फलक घेऊन हजारो नागरीक या रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरीकांनी यावेळी एनआरसी व सीएएच्या समर्थनार्थ तसेच घुसखारांविरोधात घोषणाबाजी केली.

संविधान सन्मान मंचचे संयोजक उमेश गायकवाड म्हणाले की, देशात संसद सर्वोच्च आहे, मात्र आजकाल काही उपद्रवी देशाला आग लावून यंत्रणेला ओलिस ठेवण्याच्या प्रयत्नात असुन त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. तर काँग्रेसकडून डावे पक्ष आणि इतर देशविरोधी घटकांना चिथावून दंगल घडवून आणण्याचा तसेच देशाच्या संपत्तीचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बजरंग दलचे जिल्हा संयोजक चंदन सिंह यांनी केला. तसेच सीएए कायदा लागू झाल्याने पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्थानात अत्याचार झालेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि पारशी समुदायातील लोक अनेक वर्षांपासून भारताचे नागरिकत्व आणि सन्मानाची प्रतीक्षा करीत होते. आता सीएएमुळे त्यांना नागरिकत्व मिळेल, असे व्हीएचपीचे नेता मुकेश दुबे म्हणाले.

पालघरच्या सर्कस मैदानावरुन काढण्यात आलेल्या या रॅलीची जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन सांगता झाली. या रॅलीत पालघर जिल्ह्याचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे, विहिंपचे जिल्हाध्यक्ष कुमार नागशेठ, सुधीर दांडेकर, विहिंपचे महामंत्री सुशील शाह, लक्ष्मी हजारी, रंजना संखे, पूनमचंद्र जैन, सव्राम चौधरी, विजय शेट्टी, दिनेश दुबे, कुंदन सिंग, संतोष तिवारी, आरबी सिंह आदी उपस्थित होते.

दरम्यान, या रॅलीच्या पार्श्‍वभुमीवर कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी पालघर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.