डहाणू: राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये केएलपीचे बाळासाहेब चव्हाण प्रथम

0
1908

mahanews MEDIA

BALASAHEBडहाणू दि. ५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (पुणे) यांच्यातर्फे आयोजित “माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्यस्तरीय निबंधस्पर्धा, सन २०१७-१८” मध्ये डहाणूतील के. एल. पोंदा हायस्कूलचे उप शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. पूणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्या हस्ते बाळासाहेब यांचा ५ हजार रुपये, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ प्रदान करून गौरव करण्यात आले. यावेळी शिक्षणमंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील,  शिवाजी तांबे, दीपक माली हे मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी १) ज्ञानरचनावादी अध्ययन- अध्यापन प्रक्रिया २) गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांच्या वाचन समृद्धीचे महत्व ३) शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे- काळाची गरज ४) शिक्षण प्रशिक्षणाच्या नव्या दिशा ५) जीवन व्यवहाराशी शिक्षणाची सांगड ६) विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासात सहशालेय उपक्रमांचे स्थान असे ६ विषय देण्यात आले होते. यापैकी एका विषयावर ३ हजार शब्दात सुवाच्च व स्वहस्ताक्षरात निबंध लिहायचा होता. बाळासाहेब यांनी सदर निबंध स्पर्धेत भाग घेऊन “शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे- काळाची गरज” या विषयावर निबंध लिहिला होता. बाळासाहेब हे डहाणू तालुक्यातील उपक्रमशिल शिक्षक म्हणून ओळखले जात असून या पारितोषिकामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.