- संपूर्ण कंपनी जळून खाक; सुमारे 15 कोटींचे नुकसान
- वाडा तालुक्यात अग्निशमन यंत्रणा नसल्याने संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी

प्रतिनिधी/वाडा, दि. 18 : तालुक्यातील बिलोशी येथील फोमचं उत्पादन घेणार्या हिंदुस्थान पेट्रो फोम कंपनीला आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून एकंदरीत कंपनीचे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
मंगळवारी (दि. 18) पहाटे लागलेल्या या आगीने एवढे भीषण रौद्ररुप धारण केले होते की, अवघ्या तासा-दोन तासात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. आगीचे लोळ पाहून परिसरात नागरिकांमध्ये भिती पसरली होती. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रात्री कंपनीचे उत्पादन बंद ठेवले जात असल्याने कामगार कामावर नव्हते त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाडा तालुक्यामध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने आग विझविण्यासाठी वसईहून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या. मात्र वसई ते वाडा हे अंतर दोन तासाचे असल्याने गाड्या येईपर्यंत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. वाडा तालुक्यातील कुडूस, खानिवली परिसरात सुमारे पाचशेहून अधिक छोटे मोठे औद्योगिक कारखाने असताना येथे अग्निशमन यंत्रणा नसल्याने याआधीही अनेक कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे या घटनेनंतर अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कंपनीला पहाटेच्या सुमारास आग लागली. सुदैवाने रात्री उत्पादन बंद असल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. कंपनीची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असून ती ही आग विझविण्यास अपूर्ण पडली. त्यामुळे शासनाने या भागात अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था करावी. कंपनीचे सर्व मिळून एकंदरीत 15 कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाले आहे.
-राजकुमार बन्सल, मालक, हिंदूस्थान पेट्रो फोम, बिलोशी.
