डहाणू, दि. 04 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पुन्हा एकदा पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. एका कंटेनरमधुन चोरट्या पद्धतीने हा गुटखा मुंबईच्या दिशेने नेला जात होता. पोलिसांनी वाहनांच्या तपासणीदरम्यान या कंटेनरवर कारवाई करत 8 लाख 83 हजार 500 रुपयांचा गुटखा व 11 लाख रुपये किंमतीचा कंटेनर असा एकुण 19 लाख 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच ५९ वर्षीय कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल 3 मार्च रोजी पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास महामार्गावरील चारोटी हद्दीत असलेल्या शेर ए पंजाब या हॉटेलसमोर कासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी वाहनांची तपासणी करत होते. यावेळी पोलिसांनी संशयावरुन आर.जे. 09/जी.बी. 5563 या क्रमांकाच्या कंटेरनरला अडवून तपासणी केली असता त्यात 5 लाख 25 हजार रुपये किंमतीची भोला येलो तंबाखु, 3 लाख 36 हजार रुपये किंमतीची भोला छाप तंबाखु व 22 हजार 500 रुपये किंमतीची बाबा ब्लॅक डिलक्स चोईंग टॉबॅको असा एकुण 8 लाख 83 हजार 500 रुपयांचा गुटख्याचा साठा आढळून आला.
दरम्यान, पोलिसांनी गुटखा व 11 लाखांचा कंटेनर असा एकुण 19 लाख 83 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर कासा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.