शहापूर मतदारसंघात दरोडा-बरोरा पुन्हा आमनेसामने

(निवडणूक विशेष वृत्त) प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : शहापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेने प्रवेश देत या निवडणुकीत उमेदवारीही दिल्याने नाराज झालेले शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत शिवसेनेला धक्का दिला आहे. दरोडा आणि बरोरा यांच्यात गेली 25 वर्ष राजकीय हाडवैर असल्याने एका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाहीत हे बरोरांच्या शिवसेना प्रवेशावेळीच स्पष्ट झाले होते. मात्र दरोडांच्या प्रवेशाने हे परंपरागत प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा एकमेकासमोर उभे ठाकणार असल्याने निवडणुकीतील चुरस कायम असल्याचे चित्र आहे.
शहापूर विधानसभा मतदारसंघात वाडा तालुक्यातील 49 मतदार केंद्र समाविष्ट आहेत. या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. बरोरांच्या पक्षबदलाने काही निवडक कार्यकर्तेच त्यांच्यासोबत शिवसेनेत गेले आहेत. बरोरांना आपल्यासोबत सर्वच कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा होती, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत शिवसेनेत प्रवेश घेण्याचे टाळल्याने बरोरांची चिंता वाढविणारे ठरले आहे. आमदार म्हणून बरोरांनी या भागात कायम दुर्लक्ष केल्याने जनतेत त्यांच्याविषयी आधीच नाराजी असल्याचे बोलले जाते. त्यातच शिवसेनेतही अजून ते रुळलेले नसून शिवसेनेची काम करण्याची पध्दत स्वीकारलेली नसल्याने या भागातील शिवसैनिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात त्यांना अद्यापतरी यश आलेले दिसत नाही. वर्षानुवर्षे बरोरा कुटुंबाने विरोधक म्हणून शिवसैनिकांविरोधात केलेले काम आजही वाडा तालुक्यातील शिवसैनिक विसरले नसल्याचे अनेक कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत. त्याचा फटका बरोरांना बसण्याची अधिक चिन्हे आहेत.

शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी 1995 च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार दिवगंत महादू बरोरा यांचा पराभव करत काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला होता. तेव्हापासून बरोरा विरूध्द दरोडा हा संघर्ष प्रत्येक निवडणुकीत पहावयास मिळत होता. महादू बरोरांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र पांडुरंग बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते. 2009 च्या निवडणुकीत पांडुरंग बरोरांना दरोडांकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना – भाजपच्या मतविभाजनाचा फायदा घेत बरोरा काठावरचं मताधिक्य घेत विजयी झाले. दरोडांना अवघ्या साडेपाच हजार मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. दरोडांचा पराभव शिवसैनिकांच्या खूप जिव्हारी लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना भाजप युती झाल्याने दरोडा निश्चित विजयी होतील असे चित्र होते. मात्र बरोरांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्यास पराभव पत्करावा लागेल या भीतीतून त्यांनी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून थेट शिवसेनेत प्रवेश घेत दरोडांना शह देण्याचा प्रयत्न केला. दरोडांनीही शिवसेना नेतृत्वाकडे अखेरपर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र नव्या ’समृद्ध’ राजकारणात दरोडांच्या पक्षनिष्ठेला किंमत उरली नसल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. आणि अखेर त्यांनी सोमवारी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवबंधना ऐवजी आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले.
दरोडांनी आक्रमक भूमिका घेत थेट पक्षनेतृत्वाला आव्हान देत राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याची भूमिका घेतल्याने बरोरांना सोपी वाटणारी निवडणूक आता चुरशीची होईल असे बोलले जात आहे. दरोडांचा गेली 25 वर्ष या मतदारसंघावर प्रभाव आहे. शिवसैनिकांशी नाळ जोडलेली आहे. त्यांच्या सुखदुःखात – अडचणीच्या प्रसंगी धाऊन जाण्याच्या कार्यशैलीने गावागावातील शिवसैनिकांशी ते जोडले गेलेत. त्यामुळे सामान्य शिवसैनिकाला दरोडांविषयी आपलेपणा आहे. तर बरोरा आजवर विरोधी पक्षाचे नेते व आमदार असल्याने अनेक राजकीय संघर्षात शिवसैनिकांना त्यांनी दुखावले होते. त्यामुळे शिवसैनिकांत त्यांच्याबाबतीत प्रवेशानंतरही नाराजी आहे. बरोरांच्या उमेदवारीला अनेक पदाधिकार्यांनी उघडपणे विरोध केला. ही नाराजी दूर करण्यात बरोरांना अपयश आल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही बरोरांनी पक्षांतर केल्यानंतर दरोडांवर आपले गळ टाकून ठेवले होते. राष्ट्रवादीने दरोडांना उमेदवारी देत शिवसेनेतील दरोडांना मानणारा वर्ग, बरोरांविरोधातील नाराजी संगठीत करून आघाडीचे उमेदवार म्हणून बरोरांपुढे कडवे आव्हान उभे केल्याने बरोरांच्या तंबूत चांगलीच घबराट निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आजवर बरोरांना एकतर्फी वाटणारी निवडणूक आता दरोडांच्या उमेदवारीने चुरशीची होणार आहे.