शिवसेनेतील बंडाळी युतीला ठरणार मारक; प्रकाश निकम समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

0
1845

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : विक्रमगड विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्याने पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी काल, बुधवारी (दि. 3) आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज निकम यांच्या हजारो समर्थक व चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जोरदार शक्तीप्रदर्शन करत निकम यांना अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे साकडे घातले आहे. यावेळी शिवसैनिकांच्या भावना तीव्र होत्या. त्यामुळे निकम यांची बंडाळी आघाडीला फायद्याची व सेना-भाजप युतीला धोक्याची ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

प्रकाश निकमांच्या राजीनाम्यानंतर आज त्यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानासमोर गर्दी केली होती. यावेळी शिवसैनिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तर आपण आता शिवसेना सोडली आहे, आता कार्यकर्ते जो निर्णय देतील तो मान्य अशी निकम यांनी हाक देताच सर्वांनी हात उंचावून जोरदार समर्थन देत निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची एकमुखी मागणी केली.

मात्र, प्रमुख नेत्यांच्या बैठकीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचे निकम यांनी समर्थकांना सांगितले आहे. तसेच आज रात्री कार्यकर्त्यांचे मत जाणून योग्य निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.