पालघर तहसील कार्यालयाच्या लाचखोर अव्वल कारकूनास अटक

0
1770

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 : कूळ वाहिवाटीप्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत देण्यासाठी 60 हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या पालघर तहसील कार्यालयाच्या अव्वल कारकूनास अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे. प्रशांत वासुदेव मेहेर (वय 53) असे सदर लाचखोर कारकूनाचे नाव असुन त्याच्या वतीने लाच घेणार्‍या हसमुख परशुराम राऊत (वय 48) या खाजगी इमसाला देखील अटक करण्यात आली आहे.

बोईसर येथील 53 वर्षीय तक्रारदार व्यक्तीने मागील महिन्यात आपल्या जमिनीच्या कूळ वाहिवाटीप्रमाणे दाखल दाव्याच्या निकालाची प्रत मिळावी म्हणून पालघर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. मात्र तहसील कार्यालयाचे अव्वल कारकून प्रशांत मेहेर यांनी याकामी त्यांच्याकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तर तडजोडीअंती 60 हजार रुपये देण्याचे ठरले होते. यानंतर तक्रारदाराने 1 ऑक्टोबर रोजी थेट एसीबीकडे याबाबत तक्रार केल्यानंतर एसीबीच्या पालघर युनिटकडून या तक्रारीची पडताळ करण्यात आली व यावेळी पहिला हफ्ता म्हणून तीस हजार रुपये देण्याचे ठरले.

त्यानुसार आज, शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास एसीबीमार्फत तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी लाचेचा पहिला हफ्ता म्हणून ठरलेली 30 हजार रुपयांची लाच घेताना अव्वल कारकून मेहेर यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. तर त्यांच्यावतीने लाच स्वीकरणार्‍या हसमुख राऊत या खाजगी इसमाला देखील अटक करण्यात आली.

एसीबी पालघर युनिटचे पोलीस उप अधिक्षक कलगोंडा हेगाजे, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार कदम, पोलीस नाईक सुवारे, सुतार, पालवे, चव्हाण, मांजरेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुमडा व पोलीस शिपाई दोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले असुन नागरीकांना 02525-297297, 9552250404 किंवा 1064 या टोल फ्री क्रमांकावरुन एसीबीशी संपर्क साधता येईल.