दि. 29 जुलै: डहाणू शहरातील कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या 145 वर पोहोचली असल्याने लोकांच्या मनामध्ये दडपण निर्माण झाले आहे. आता किमान 7 दिवसांचे कडक लॉक डाऊन व्हावे असा आग्रह लोकांकडूनच प्रशासनाकडे केला जात आहे. 14 जुलै रोजी सर्वप्रथम डहाणू शहरात लॉक डाऊन व्हावे असा प्रस्ताव नगरपरिषद प्रशासनाकडून सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला होता. त्या दिवशीच्या कोरोना बाधीतांचा आकडा आता तिप्पट वाढला असून 2 मृत्यू झाले आहेत. 21 जुलै जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या 91 ह्या संख्येत अवघ्या 7 दिवसांत 54 पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. डहाणू नगरपरिषदेचे आरोग्य सभापती भाविक सोरठी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गट नेत्या किर्ती मेहता ह्यांनी आधीच लॉक डाऊनची मागणी केली आहे. दरम्यान डहाणूचे सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची बदली झाली असून त्यांचा पदभार जव्हारच्या सहाय्यक जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्याकडे दिल्याने निर्णय घेण्यास विलंब होत आहे. नायर यांच्याकडे आधीच 2 पदभार आहेत. आता त्यांच्याकडे जव्हार व डहाणूचे साहाय्यक जिल्हाधिकारी आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी असा 4 पदांचा भार आहे. त्यामुळे डहाणू शहराचे लॉक डाऊन लाल फितीत अडकले आहे.
राजतंत्र कडे अनेक डॉक्टर्स, नगरसेवक, व्यापारी लॉक डाऊन व्हावे अशी भावना व्यक्त करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही जनमताचा कौल घेतला असता 48 तासांत 2 हजार 76 लोकांनी आपली मते नोंदवली. ह्या जनमतामध्ये (अर्थात मते नोंदविणारे फक्त डहाणू शहरातील नाहीत) एक हजार 917 (92%) लोकांनी लॉक डाऊनच्या बाजूने कौल दिला असून फक्त 143 लोकांनी लॉक डाऊनच्या विरोधात कौल दिला आहे. 16 जण तटस्थ राहिले आहेत.
