वाडा : तालुका क्रीडा संकुलाचे काम संथ गतीने

0
1650

राजतंत्र : वार्ताहर
वाडा : खेळांना देशात अनन्य साधारण महत्व असून लहान खेडेगावातील अनेक खेळाडूही अगदी ऑलिंपिकमध्ये देशाचे नाव सुवर्णअक्षरात कोरतात अशी कित्येक उदाहरणे आहेत. वाडा तालुक्यातील खेळाडूंच्या विकासासाठी महत्वाचे असणारे क्रीडा संकुल मात्र लोकप्रतिनिधी व शासनाच्या बेफिकीरीमुळे लालफितीत अडकले आहे. कोने – चिखले मार्गावर असलेल्या क्रीडा संकुलाच्या उभारणीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून कुंपन व अन्य किरकोळ कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कोने गावाच्या हद्दीत असलेल्या 16 एकर जागेत तालुका क्रीडा संकुल उभारणी होणार असून यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे यातील जवळपास 74 लाखांचा निधी वर्ग करण्यात आला असून क्रीडा संकुलाच्या उभारणीने खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. 2003 साली या संकुलासाठी जागा उपलब्ध झाली असली तरी संकुलाच्या जागेत अजूनही अतिक्रमणे जैसीथे असल्याने ती हटविणे मोठे आव्हान असणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध निधीतून थातुरमातुर कामे केली आहेत असा लोकांचा आरोप असून संरक्षक भिंतीचे फाउंडेशन, स्वच्छतागृह ,प्रवेशद्वार तसेच कमान अशी कामे अजूनही अपूर्णच आहेत. क्रीडा संकुलाच्या उभारणीकडे कुणाचेही खास लक्ष नसून प्रशासनाच्या सावळ्या गोंधळात खेळाडूंच्या वाट्याला मात्र केवळ प्रतीक्षा आली आहे.

क्रीडांगणाच्या उभारणीला अजून किती तपश्यर्या करावी लागणार आहे असा सवाल उपस्थित केला जात असून सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. नेमका किती निधी खर्च झाला असून अजून किती वेळ व निधी या क्रीडा संकुलाच्या उभारणीला लागणार आहे यासाठी क्रीडा विभागाला अनेकदा विचारणा करूनही कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

माझी नुकताच या जागी नेमणूक झाली असून प्रभारी पदभार माझ्याकडे आहे, क्रीडा संकुलाबाबत पुरेशी माहिती नसल्याने अधिक माहिती घेऊन याबाबत बोलणे योग्य होईल.
-भक्ती आमरे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर

उपलब्ध निधी नुसार कामे केली जातात, संरक्षक भिंतीच्या फाउंडेशनचे काम जवळपास पूर्ण झाले असून अपूर्ण राहिलेले काम लवकरच पूर्ण होईल, प्रवेशद्वार व कमान कुठे उभारायची याबाबत जागा निश्चित होत नसल्याने ते काम रखडले आहे.
-अनिल भरसट, उप अभियंता, सा, बां. उपविभाग वाडा