राष्ट्रीय प्रकल्पांसाठी पालघर जिल्ह्यात १ हजार ३३० हेक्टर जमीनीचे संपादन!

0
2871
LOGO 4 Onlineप्रतिनिधी
         बोईसर, दि. २७ : पालघर जिल्ह्यामधून जाणाऱ्या विविध  प्रकल्पांमध्ये रेल्वे चौपदरीकरण, राष्ट्रीय द्रुतगती मार्ग आणि बुलेट ट्रेन ह्या राष्ट्रीय प्रकल्पांचे काम सुरु झाले असून याकामी १ हजार ३३० हेक्टर जमीन संपादित होणार आहे.  ही जमीन सन २०१३ चा  नवीन भूसंपादन कायदा आणि १२  मे २०१५ च्या शासन निर्णयाच्या आधारे खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने होणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट  केले आहे.    
        पालघर जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प येणार असून या प्रकल्पांना आदिवासी  व शेतकरी, आदिवासी संघटना व अन्य सर्वपक्षीयांनी  अनेक वेळा आंदोलने व मोर्चे काढून विरोध दर्शविला आहे .तसेच काम सुरू करण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावण्याचे काम नागरिकांनी केले .मात्र तरीही या सर्व प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र  या  भुसंपादनाच्या विरोधात काढलेल्या मोर्च्याबाबत आमदार विलास तरे,  क्षितिज ठाकूर आणि  हितेंद्र ठाकूर यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला महसूल मंत्री यांनी उत्तर देताना पालघर जिल्ह्यातील भूसंपादनाची माहिती  दिली.
         पालघर जिल्ह्यात वाढवणं बंदर या प्रस्तावित प्रकल्पासाठी जमीन संपादनासाठी कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेला नाही. विरार – डहाणू रेल्वे चौपदरीकरण प्रकल्पासाठी पालघर, डहाणू व वसई तालुक्यातील २८  गावांमधील सुमारे ४१.४ हेक्टर  जमीन संपादित करण्यात येत असल्याचे महसूलमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे. मुंबई-अहमदाबाद  बुलेट ट्रेन या प्रकल्पाकरिता पालघर जिल्ह्यातील एकूण ६४  गावांमधील जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला असून या प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील २०७ . १२ हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये मुंबई- वडोदरा राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी एकूण  १ हजार ८० हेक्टर   जमीन संपादित करावयाची असून पालघर तालुक्यामधील बारा  गावांतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे या गावांमध्ये  अधिसूचना प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती महसूलमंत्री पाटील यांनी दिली आहे.