
राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 4 : एका इसमावरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी तसेच त्याला जामीन मिळवून देण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा नालासोपारा पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस उप निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
मागील महिन्यात नालासोपार्यातील कासा टेरेसा भागात राहणार्या एका 37 वर्षीय इसमावर एका प्रकरणात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याच्यावरील अटकेची कारवाई रोखण्यासाठी तसेच त्याला जामीन मिळवून देण्यासाठी नालासोपारा पोलीस स्टेशनचा पोलीस उप निरीक्षक सिध्देश सुरेश शिंदे (वय 32) याने त्याच्याकडे 10 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे सदर इसमाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 31 मे, 1 जुन व 3 जुन अशी तीन दिवस या तक्रारीची पडताळणी करुन काल, 3 जुन रोजीच सापळा रचून पोलीस उप निरीक्षक शिंदे याला 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
