डहाणू : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या 5 नगरसेवकांची घरवापसी; भाजपला झटका

0
2753

RASHTRAWADI GHARVAPSI
राजतंत्र न्युज नेटवर्क
राष्ठ्रवादी काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांच्या जिवावर डहाणू नगरपरिषदेवार स्ता प्रस्थापीत करण्याचे मनसुबे उधळले गेले आहेत. माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2 दिवसांपूर्वी भाजपात दाखल झालेले माजी नगराध्यक्ष शशिकांत बारी, नगरसेवक शमी पिरा, नगरसेविका सौ. रेणूका व शैलेश राकामुथा यांनी यु टर्न घेत घरवापसी केली आहे. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर तेथील अनिश्‍चितता पाहून निराश झालेले हे सर्वजण माघारी फिरले आहेत. अपेक्षेप्रमाणे मिहीर शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.
भाजपमधील अनिश्‍चितता
भारतीय जनता पक्षाने आयाराम संस्कृतीच्या जोरावर डहाणू शहरातील स्थान बळकट करताना उद्या (24 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज भरायची शेवटची मुदत संपेपर्यंत अधिकृत उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच ठेवली आहेत. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांसह आयात उमेदवारांच्या मनात देखील चलबिचल सुरु होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य उमेदवारांची मिहीर शहा किंवा रविंद्र फाटक यांना उमेदवारी मिळावी ही अपेक्षा देखील अंधूक होताना दिसत होती. या अनिश्‍चिततेला कंटाळून नव्या भिडूंनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद ठाकूर यांनी या संधीचा लाभ घेत सर्वांचे स्वागत केले. या अनपेक्षीत घडामोडीमुळे भाजपची त्रेधातिरपीट उडाली. यानंतर भाजपचे नेते पक्षाचे तिकीट हाती घेऊन पुन्हा नाराज उमेदवारांच्या घरी पोचले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
भाजप तोंडघशी पडले
तलासरी आणि विक्रमगडमधील नगरपंचायतींमध्ये झालेल्या निवडणूकांमध्ये भाजपला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवावर पांघरुण घालण्यासाठी यावेळी कशाही पद्धतीने सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात तोडफोडीचे राजकारण करणार्‍या भाजपला स्वकीयांकडून देखील प्रखर टिकेचा सामना करावा लागत होता. आता भाजपला धडा मिळाल्यामुळे नेत्यांना कार्यकर्त्यांकडून कडक टिका ऐकावी लागत आहे.
सर्वच पक्षांचे उमेदवारी अर्ज उद्या
सर्वच पक्षांना उमेदवार गोळा करणे आणि दुसर्‍या पक्षाने नाकारल्यामुळे आपल्याकडे कोणी येतो का याची वाट पहाणे या प्रयत्नात उमेदवारी यादी जाहिर करता आली नाही. आज (24 नोव्हेंबर) बहुसंख्य उमेदवारांचे अर्ज दाखल होणे अपेक्षीत आहे.