पालघर येथील क्रीडा संकुल होणार अद्यावत; आमदार श्रीनिवास वनगांच्या उपस्थितीत क्रीडा समितीची बैठक संपन्न!

0
3773

पालघर, दि. 26 : येथील तालुका क्रीडा संकुलाची इमारत अद्यावत करण्यासंदर्भात नुकतीच पालघर तहसील कार्यालयात तालुका क्रीडा समितीची आढावा बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा आमदार श्रीनिवास वनगा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार सुनील शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश शहा, समितीचे इतर सदस्य, पोलीस निरीक्षक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एम. पी. किणी, पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जगताप, गट शिक्षणाधिकारी जाधव, तालुका क्रीडा समितीचे क्रीडा अधिकारी तथा सदस्य सचिव कलावंत व त्यांचे सहकारी वाघ, नायब तहसीलदार गडग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी क्रीडा समितीच्या विविध कामांचे नियोजन करण्यासाठी खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच तालुका क्रीडा संकुलामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि फुटबॉल क्रीडांगण व व्यायाम शाळा बांधकामाबाबतचे प्रस्ताव तयार करण्याबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर जोगर्स ट्रक बनवणे, क्रीडासंकुलापर्यंत रस्ता बनवणे, क्रीडा संकुलास संरक्षक भिंत बांधणे आदी कामांची मंजुरी घेण्यात आली.

क्रीडासंकुलासाठी सध्या अडीच एकर जागा मंजूर असून पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे हे लक्षात घेऊन भविष्यातील तरतूद म्हणून 19 एकर क्षेत्र मिळण्याबाबतच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना, शासनाच्या वतीने ज्या काही सोयी सवलती मंजूर करून घ्यायच्या असतील, त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव प्रयत्नशील राहील. तसेच जिल्हा तालुका क्रीडा संकुल ही इमारत अद्यावत व क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंना व मान्यवरांना या संकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही यावेळी आमदार वनगा यांनी दिली. बैठकीनंतर सर्व समिती सदस्यांनी तालुका क्रीडा संकुलाची पाहणी केली व संकुल अद्यावत करण्यासाठी सूचना केल्या.