वसई : जन्मदात्या पित्याने आपल्या 30 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या केल्याची घटना वसई तालुक्यातील नालासोपारा भागात घडली आहे. अमन शेख (वय 32) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, ख्वाजामियाँ शेख (वय 54) असे आरोपी पित्याचे नाव आहे. अमन हा कोणताही कामधंदा करत नसल्याने तसेच व्यसनाच्या आहारी गेल्याने पिता ख्वाजामियाँ शेख यांनी त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
नालासोपारा पश्चिमेतील निलेमोरे गावामधील साई गणेश वेल्फेअर सोसायटीतील युनिक अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये ख्वाजामियाँ शेख हे आपले दोन मुलं अमन शेख व अश्रफ शेख यांच्यासोबत रहावयास होते. लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने तसेच व्यवसानाच्या आहारी गेल्याने अमनचे नेहमी आपल्या वडिलांसोबत वाद होत होते. काल, 29 जुलै रोजी अश्रफ हा काही कामानिमित्त घराबाहेर गेला असताना अमनचा पुन्हा वडिलांसोबत वाद झाला. यावेळी अमन वडिलांना मारायला त्यांच्या अंगावर धावून गेल्याने दोघांमध्ये झटापटी झाली व यातच संतापलेल्या वडिलांनी त्याची गळा आवळून हत्या केली.
या घटनेची खबर नालासोपारा पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपी पिता ख्वाजामियाँ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.