वार्ताहर/बोईसर, दि. 12 : गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार बसणार्या भूकंपाच्या धक्क्यामुळे डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी भागात अखेर दिल्लीवरून आलेल्या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या पथकाकडून भूकंप मापक यंत्र बसविण्यात आले असुन येथील सासंवद ग्रामपंचायत हद्दीतील वेदांत हॉस्पिटलमध्ये हे यंत्र बसविण्यात आले आहे.
डहाणू तालुक्यातील पूर्व भागातील डोंगराळ भागांमध्ये वसलेल्या धुंदलवाडी परिसरातील वंकास पाडा, चिंचले, पारडी, हळद पाडा, अंबोली, सासवड आदी पाड्यांना गेल्या दोन महिन्यांपासून 2.3 ते 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के बसत आहेत. वारंवार बसणार्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन अनेकांनी येथून स्थलांतर केले आहे. तर धुंदलवाडी आश्रम शाळेतील 700 विद्यार्थी व चिंचले आश्रम शाळेतील चारशे विद्यार्थी भूकंपाच्या भितीपोटी महिन्याभरापासुन शाळा सोडून घरी बसले आहेत.
डहाणू आणि तलासरी तालुक्याच्या काही भागात बसणार्या भूकंपाच्या धक्क्याच्या पार्श्वभुमीवर हवामान शास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचे पथक पाहणासाठी या भागात दौर्यावर आहे. या पथकात दिल्ली हवामान शास्त्र विभागाचे कमलेश चौधरी व मुंबई हवामान शास्त्र विभागाचे किरण नरखेडे यांच्यासह पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचार्यांचा समावेश आहे. या पथकाने आज वेदांत हॉस्पिटलमध्ये भूकंप मापन यंत्र बसविले असुन या भागात भूकंपाचे धक्के बसल्यास त्याच्या लहरी दिल्लीत कार्यरत असणार्या पथकाला समजतील व पुढे भूकंप केंद्राचा शोध लागून त्यानुसार यंत्रणा पुढील कार्यवाही करणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कदम यांनी सांगितले.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!