जमिनीचा मोबदला देताना दुजाभाव; डहाणूतील संतप्त शेतकर्‍यांकडून रिलायन्सची गॅस पाईप उखडण्याचा प्रयत्न

0
1924

LOGO-4-Onlineवार्ताहर
बोईसर, दि. 13 : रिलायन्स कंपनीने गॅस पाईपलाईन प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला देताना दुजाभाव केल्याचा आरोप करत तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाला तीन महिने उलटूनही जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने संतप्त झालेल्या डहाणू तालुक्यातील तवा येथील शेतकर्‍यांनी आजपासुन रिलायन्सची गॅस पाईपलाईन उखडण्याचे आंदोलन सुरु केले आहे. तसेच जो पर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशाराही दिला आहे.
2014 साली रिलायन्सकडून नागोठणे ते दहेज दरम्यान गॅस पाईप लाईन टाकण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. तर 2017 साली हे काम पूर्ण झाले होते. मात्र या प्रकल्पासाठी केलेल्या भूसंपादनाचा मोबदला देताना कंपनीतर्फे दुजाभाव करण्यात आला असुन काही शेतकर्‍यांच्या जमिनीला प्रति गुंठा 3 लाखापासुन 5 लाखापर्यंत, तर अनेक शेतकर्‍यांना प्रति गुंठा 9 हजार 600 रुपयांपर्यंत मोबदला दिला गेला. त्यामुळे संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला देताना रिलायन्सने निरक्षर आदिवासी शेतकर्‍यांची चेष्टा केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. या विरोधात मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थानापर्यंत लाँग मार्च काढण्यात आल्यानंतर खासदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी येत्या 15 दिवसात योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही मोबदल्याची रक्कम न मिळाल्याने आक्रमक झालेल्या तवा येथील शेतकर्‍यांनी आपल्या शेतीतून गेलेली पाईपलाईन खोदायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, सदर पाईप लाईनमधुन गॅस पुरवठा सुरू असल्याने या आंदोलनात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.