
वसई, दि. 4 : वसई पूर्वेतील सायवन गावातील एका घरातून विरार पोलीसांनी आज 183 जिलेटीनच्या कांड्या व 448 डेटोनेटर असा स्फोटकांचा साठा जप्त केला असुन याप्रकरणी तुकाराम मारुती हडळ (वय 50, रा. सायवन) व त्याची पत्नी भीमा तुकाराम हडळ (वय 45) या दाम्पत्याला अटक केली आहे.
विरार पोलिसांना हडळ याच्या घरात स्फोटकांचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बी. टी. घनदाट यांच्या पथकाने आज दुपारी 1 वाजताच्या दरम्यान सदर घरावर चापा मारुन 183 जिलेटीन कांड्या, 103 इलेक्ट्रॉनिक डेटोनेटर व 345 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर असा स्फोटकांचा साठा जप्त केला. याप्रकरणी हडळ दाम्पत्यावर भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियमचे कलम 4/ख प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.
रेती उपसा करण्यासाठी स्फोटकांचा वापर!
वसईच्या खाडीत सेक्शन पंप लावून बेकायदेशीरपणे हजारो ब्रास रेती उपसा करण्यात येत असते. या वाळू माफियांवर पोलीस आणि महसूल प्रशासनाची कारवाई सुरू असली तरी वाळू माफिया सक्रीय आहेत. खाडीत असलेली वाळू एकत्रित मोठ्या प्रमाणावर जमा करता यावी यासाठी या वाळूमाफियांकडून खड्डा खोदण्यासाठी स्फोटकांचा वापर केला जातो. तसेच खाडीत स्फोट करून तळाशी असलेली घट्ट वाळू सैल होते आणि सक्शन पंपाद्वारे ती गोळा केली जाते. यामुळे एकाच वेळी हजारो ब्रास वाळू मिळते.