पालघर : घरफोडी करणारी टोळी अटकेत

0
1772

12.5 लाखांचा ऐवज हस्तगत!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : येथील सातपाटी भागातील दोन घरांमध्ये रात्रीच्या सुमारास चोरी करुन लाखोंचे दागिने लंपास करणार्‍या चार जणांच्या टोळीला गजाआड करण्यात अखेर सातपाटी पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. या टोळीकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 12 लाख 49 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात सातपाटीतील दोन घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास केला होता. यातील एक घटना सातपाटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर दुसरी घटना सातपाटी सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासासाठी सातपाटी पोलीस स्टेशन स्तरावर एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने काही दिवसातच या टोळीतील मुख्य आरोपी सुमित भगवान शेळके (वय 22, रा. रायगड) याला अटक केली होती. तर इतर 3 आरोपी फरार होते. अखेर सुमित शेळकेच्या चौकशीनंतर नारायण भैरवसिंग चुन्डावत (वय 23), विक्रमसिंग रामसिंग सोळंखी (वय 29) व नारायण भुरसिंग सोलंकी (वय 24) या तीन फरार आरोपींना नुकतीच दिवा व डोंबिवली परिसरातुन अटक करण्यात आली. नारायण चुन्डावत व नारायण सोलंकी हे दोघे चोरटे चोरीचे दागिने वितळवुन त्याचे वेगवेगळ्या आकाराचे व डिझाईनचे दागिने तयार करुन ते विक्री करण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापुर्वीच पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोघांना मानपाडा परिसरातून अटक करण्यात आली.

या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल तसेच चोरीला गेलेले दागिने असा एकुण 12 लाख 49 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असुन सातपाटी पोलीस अधिक तपास करत आहेत.