केवळ 800 रुपयांच्या वाटणीवरुन केला होता आईचा खून

राजतंत्र न्युज नेटवर्क/ डहाणू, दि. 5 : केवळ 800 रुपयांच्या वाटणीवरुन उद्भवलेल्या वादातून आईचा खून करणार्या मुलाला न्यायालयाने 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. रमेश रामा कुवरा (वय 35) असे आरोपीचे नाव असुन 4 वर्षांपुर्वी कासा येथे ही घटना घडली होती.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवरा कुटूंबियांनी 2015 साली आपल्या मालकीतील जळावू चिंचेचे झाड 800 रुपयांत विक्री केले होते. यावेळी रमेश कुवरा याला या पैशांच्या वाटणीमध्ये हिस्सा न मिळाल्याने त्याने रागाच्या भरात रामा कुवरा व सौ. चापी कुवरा या आपल्या आई-वडिलांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली होती. यात सौ. चापी कुवरा यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी रमेश कुवरा विरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उप निरिक्षक डि. के. पालवणकर यांनी याप्रकरणी अधिक तपास करत आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या पुराव्यांना ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला 4 वर्षे सक्त कारावासाची शिक्षा सुनावली असुन शिक्षेनंतर आरोपीची ठाणे येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.