डहाणू : महामार्गावर मांडूळ प्रजातीचे साप जप्त

0
3632
संग्रहित छायाचित्र

डहाणू, दि. 20 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा (ता. डहाणू) हद्दीत पोलिसांनी वन विभागाच्या मदतीने दुर्मिळ असे मांडूळ प्रजातीचे 3 साप जप्त केले आहे. याप्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली असुन त्यांच्यावर कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औषध तसेच काळीजादू करण्यासाठी मोठी मागणी असलेल्या या सापांसाठी कोट्यावधी रुपये मोजले जातात. यापुर्वी मनोर येथून दोन व वाडा येथे एक मांडूळ साप पोलिसांनी जप्त केला होता.

19 जानेवारी रोजी पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक रविंद्र पारखे यांना, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काही इसम मांडूळ जातीचे 3 दुर्मिळ सर्प वन्यजीव औषध पदार्थ व काळीजादू करण्यासाठी विक्रीकरता येणार असल्याची माहिती मिळाली होती. पारखे यांनी लागलीच वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांसह संयुक्तरित्या सापळा रचून महामार्गावरील अंबोली गावाच्या हद्दीतील अपोली हॉटेल समोरुन दोन संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात तीन मांडूळ साप आढळून आले. पोलिसांनी या सापांच्या किंमतीबाबत माहिती दिली नसली तरी काळा बाजारात कोट्यावधींच्या किंमतीने या सापांची तस्करी होत असते.

याप्रकरणी दोन्ही तस्करांविरुद्ध कासा पोलीस स्टेशनमध्ये वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 39(3) सह कलम 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस. एच. सरगर करत आहेत.