दागिने खरेदीच्या नावाखाली महिला ग्राहकाच्या बॅगेतील 90 हजार केले लंपास

पालघरमधील नॅशनल ज्वेलर्समधील घटना; चोरी सीसीटिव्हीमध्ये कैद

0
2288

पालघर, दि. 20 : एका अज्ञात महिलेने दागिने खरेदीच्या नावाखाली ज्वलेर्सच्या दुकानात प्रवेश करुन अन्य एका महिला ग्राहकाच्या बॅगेतील 90 हजार रुपये हातचलाखी करुन लंपास केल्याची घटना पालघरमधील नॅशनल ज्वेलर्समध्ये घडली आहे. ही घटना दुकानातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असुन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=-2XhJV7susU&ab_channel=DAILYmahanews

मिळालेल्या माहितीनुसार, काल 19 जानेवारी रोजी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास दुर्वा दिपक देसले नामक महिला आपल्या आईसह नॅशनल ज्वेलर्समध्ये दागिने खरेदीसाठी आली होती. याचदरम्यान दोन अज्ञात महिलांनी दुकानात प्रवेश केला आणि दुर्वा यांच्या बॅगेजवळ वावरु लागल्या. दुर्वा दागिने पाहण्यात व्यस्थ असल्याचा फायदा घेत काही सेकंदातच दोघींपैकी एकीने अत्यंत चतूराईने हातचलाखी करुन त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम लंपास केली व दुकानातून फरार झाले. याबाबत अनभिज्ञ असलेल्या दुर्वा यांनी काही वेळाने आपली बॅग तपासली असता त्यातील रोख रक्कम गायब होती. यानंतर त्यांनी दुकानाचे मालक अरुण जैन यांना ही बाब सांगितली. जैन यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर एक महिला बॅगेतून रक्कम चोरी करत असल्याचे दिसून आले.

दुर्वा देसले यांनी याबाबत पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन सीसीटिव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस सदर महिलेचा शोध घेत आहेत.