
राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) च्या एजंटचे काम करुन देण्यासाठी त्याच्याकडे 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या महावितरणच्या वसई तालुक्यातील वालीव शाखेच्या सहाय्यक अभियंत्याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. कश्यप मनोहर शेंडे (वय 42) असे सदर सहाय्यक अभियंत्याचे नाव असुन आज, गुरुवारी अॅँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) पालघर कॅम्पने ही कारवाई केली.
संबंधित बातमी : पालघरमधील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक
39 वर्षीय तक्रारदार व्यक्ती महावितरणचा एजंट असुन त्याने त्याच्या एका ग्राहकाच्या विद्युत पुरवठा भार कपातीसाठी (रिडक्षण लोड) महावितरणच्या वालीव शाखेचा सहाय्यक अभियंता शेंडे याच्याकडे अर्ज केला होता. मात्र हे काम करुन देण्यासाठी शेंडे याने तक्रारदाराकडे काल, बुधवारी (दि. 20) 6 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने या तक्रारीची पडताळणी करुन आज, गुरुवारी सापळा रचला असता सहाय्यक अभियंता शेंडे याला तक्रारदाराकडून 6 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
एसीबीच्या ठाणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मुकूंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर कॅम्पचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार कदम, मदने, पोलीस नाईक सुवारे, पालवे, पोलीस काँस्टेबल सुमडा, मांजरेकर व पोलीस शिपाई दोडे यांच्या पथकाने ही यशस्वी सापळा कारवाई केली.
दरम्यान, चालखोर सहाय्यक अभियंता शेंडे याच्याविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.
