पालघर, दि. 23 : राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा ग्रामीण विकासाला चालना देणारा असुन शेती हा केंद्र बिंदू मानून दुष्काळमुक्ती आणी बळीराजाच्या सक्षमीकरणावर भर देणारा असल्याचे मत डहाणू येथील एस. आर. करंदीकर महाविद्यालयात आयोजीत कार्यक्रमात उपस्थित तज्ञांनी व्यक्त केले. या अर्थ संकल्पतील तरतुदीबाबत युवकांनी सजग राहून अर्थसंकल्पाचा अभ्यास करावा असेही मत या मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनयाचे पालघर जिल्हा माहिती कार्यालय आणि एस. आर. करंदीकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थसंकल्प समजून घेताना या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रामध्ये प्रा. रूपेश गायकर, चाटर्ड अकऊंटंट राजेश लाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र घागस, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, जिल्हा माहिती अधिकारी सौ. मनिषा पिंगळे आदी सहभागी झाले होते.
प्रा. रूपेश गायकर यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प तयार करताना विचारात घेतल्या जाणार्या बाबी, राज्याचे दरडोई उत्पन्न, महसूली तूट, अर्थसंकल्पाची रचना, एकत्रित निधी, आर्थिक पाहणी, महसूल व जमा खर्च इत्यादी बाबत पॉवर पॉईट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले. यावेळी गायकर यांनी सांगितले की, अर्थ संकल्प सादर करताना अर्थमंत्री शासनाच्या योजनांची तसेच आगामी वर्षात राबविण्यात येणार्या आवश्यक निधींची तसेच कर प्रस्ताव या बाबींची माहिती देणारा अर्थसंकल्प सादर करतात, शासनाकडे येणार्या निधीमध्ये महसूलातून मिळणारा निधी, भांडवलाच्या माध्यमातून आणि कर्जाच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असतो. या निधीमधून प्रशासकीय सेवांवरील खर्च, शासनाने घेतलेल्या कर्जावरील व्याज आणि प्रकल्पासांठी आवश्यक निधीची तरतूद केली जाते. राज्याच्या समतेाल व सर्वागिण विकासाची दिशा ठरवताना सर्व समाज घटकांसाठी निधीची तरतूद या अर्थसंकल्पमध्ये करण्यात आली आहे. ही या अर्थसंकल्पाची जमेची बाजू आहे.
दैनिक राजतंत्रचे संपादक श्री. संजीव जोशी यांनी अर्थसंकल्प हा जनतेच्या प्रगतीचे प्रतिक असते. एक सजग नागरिक या नात्याने आपल्या आजुबाजूला घडणार्या घटनांचे विश्लेषण करण्याबरोबरच शासनाच्या योजनांच्या अमंलबजावणीकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. आपल्या आजुबाजूला विकास कामांसाठी येणारा निधी विकास कामावर खर्च होतो आहे की नाही याची प्रत्येकाने माहिती घेतली पाहिजे. उपलब्ध झालेला निधी विकास कामावर खर्च होत नसेल तर तिची कारणेही एक सुज्ञ नागरिकांनी शोधली पाहिजे, असे मत व्यक्त केले. समाजामध्ये अर्थसंकल्पाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल अतिशय स्तुत्य असून भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रम व्यापकपणे राबविण्यात यावे असेही जोशी यांनी सुचवले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र घागस यांनी समाजामध्ये आर्थिक विकास साध्य करावयाचा असेल तर आर्थिक साक्षरता येणे आवश्यक असल्याचे सांगून अशा प्रकारच्या अर्थसंकल्पावरील चर्चा विद्यार्थ्यांसमोर आयेाजित करणे हा चांगला उपक्रम आहे असे सांगितले. या अर्थसंकल्पामध्ये शेतीच्या विकासाबरोबरच शिक्षण, सामजिक न्याय या सारख्या क्षेत्रात शासन भरीव तरतूद करत असले तरी दिलेला निधी योग्य प्रमाणात खर्च होतो की नाही ही बघण्याची जबाबदारी सुज्ञ नागरिकाची आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. चाटर्ड कांउटंट लाडे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान केले. जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी कान, नाक, डोळे उघडे ठेऊन समाजात वावरणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच कार्यक्रम आयोजनामागची भुमिका विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. रोमिओ म्हस्करेन्हास यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर कामत यांनी केले.