बोईसरमध्ये गांजाची शेती उद्ध्वस्त!

0
2168

एकाला अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 16 : येथील नेवाळे रेल्वे फाटक परिसरात बेकायदेशीररित्या पिकवण्यात येत असलेली गांजाची शेती बोईसर पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केली असुन येथून 1 लाख 14 हजार रुपये किंमतीची गांजाची झाडे व सुकलेली गांजाची पाने जप्त करण्यात आली आहेत. तसेच याप्रकरणी संबंधित इसमाला अटक करण्यात आली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे रेल्वे फाटक परिसरातील धिरुभाई याच्या वाडीत गांजाची शेती केली जात असल्याची गुप्त माहिती बोईसर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन बोईसर पोलिसांच्या एका पथकाने काल (दि. 15 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला असता येथे लहान-मोठी हिरव्या पानाची गांजाची झाडे पिकवली जात असल्याचे दिसुन आले. यानंतर पोलिसांनी ही शेती उद्ध्वस्त करत गांजाची झाडे व सुकलेल्या गांजाची पाने असा एकुण 1 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन इंद्रदेव रामकिशोरदास भंजगोविंद (वय 81) या वृद्धाला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये बेकायदेशीरित्या गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.