दि. 2 जून : डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रिती अक्रे यांना व्हॉट्सऍप सोशल मिडीयावरुन धार्मिक विद्वेश पसरविणारा मॅसेज पोस्ट केल्याच्या आरोपाखाली वाणगांव पोलीसांनी अटक केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
अक्रे यांना डहाणू येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जावेद मुलाणी यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी आरोपीची 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. पोलीस कोठडी सुनावताच अक्रे या न्यायालयाच्या आवारातच मुर्छा येऊन खाली पडल्या. यानंतर पोलीसांनी त्यांना डहाणू उप जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले. तपासणीअंती रुग्णालयाने प्रकृती स्थिर असल्याचे सांगत त्यांना दाखल करुन घेतले नाही.
काल अक्रे यांनी ही पोस्ट फॉरवर्ड केल्यानंतर विशिष्ट धर्माचे लोक पोलीस स्टेशनला जमा झाले होते. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या करीता त्वरेने वरीष्ठ पोलीस अधिकारी देखील तेथे पोहोचले. यानंतर पोलीसांनी भारतीय दंड संहीतेच्या कलम 295 अ अन्वये गुन्हा दाखल केला व अक्रे यांना अटकही करण्यात आली. अक्रे यांच्या ताब्यातून त्यांचा मोबाईल पोलीसांनी जप्त केला आहे.
शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणार्या प्रिती अक्रे या व्हाया राष्ट्रवादी कॉंग्रेस आता भाजपामध्ये स्थिरावल्या आहेत. त्या भाजपामध्ये असल्याकारणाने भाजपच्या विरोधकांच्या हातात यातून आयतेच कोलीत सापडले आहे.