पालघर, दि. 6 : डहाणू तालुक्यामध्ये 5 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत सरासरी 46.5 से.मी. इतकी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तर पालघर तालुक्यामध्ये सरासरी 38 से.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये 5 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत सरासरी 26.5 से.मी. तर 6 ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत सरासरी 6.4 से.मी. पावसाची नोंद झाली आहे
या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या 119 असून अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या 17 आहे. 13 घरे आणि 1 झोपडीची पुर्णतः पडझड झाली असून नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे.
डहाणू तालुक्यातील मौजे शेणसरी येथील कु. ममता विजय लिलका ही मुलगी पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने जखमी झालेली होती. तिच्यावर सायवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थीर आहे.
पालघर तालुक्यातील 159, वसई तालुक्यातील 10 व डहाणू तालुक्यातील 1 घरांमध्ये पाणी शिरलेले असून डहाणू तालुक्यातील 2 गायी, 1 रेडा आणि 8 बकऱ्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.