वाडा तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघ पुरस्कार

0
5048

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : मराठी पत्रकार परिषद (मुंबई) या पत्रकारांच्या अखिल भारतीय स्तरावर काम करणार्‍या पत्रकार संघटनेतर्फे वाडा तालुका पत्रकार संघाला प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. रविवारी (दि. 9) बीड जिल्ह्यातील वडवणी येथे पार पडलेल्या तालुका अध्यक्षांच्या भव्य अशा मेळाव्यात पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा व दैनिक सकाळच्या औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन, विभागीय सचिव तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, माजी आमदार केशव आंधळे, अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कारामुळे पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. वाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील व त्यांचे सहकारी जयेश शेलार, वैभव पालवे, दिनेश यादव, शशिकांत कासार, सचिन भोईर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष नीरज राऊत, ज्येष्ठ पत्रकार अच्युत पाटील, संदीप जाधव वाडा तालुका पत्रकार संघाचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. मेळाव्यास राज्यभरातून परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, 355 तालुक्यांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्यात ग्रामीण पत्रकारितेबाबत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. अशोक पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना वाडा तालुका पत्रकार संघाच्या वाटचालीचा आढावा घेत पुरस्काराबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे आभार मानले.

वाडा तालुका पत्रकार संघ हा मागील 20 वर्षांपासून कार्यरत असून पत्रकारांच्या विविध हक्कांसाठी व अन्यायाविरुद्ध लढाऊ भूमिका घेत असतो. याव्यतिरिक्त विविध सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीतही संघाने वेळोवेळी सक्रीय सहभाग घेतलेला आहे. या पुरस्काराबद्दल वाडा तालुका पत्रकार संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. हा पुरस्कार म्हणजे वाडा तालुक्यातील पत्रकारांनी गेली अनेक वर्षे केलेली प्रभावी पत्रकारिता व जनतेच्याप्रती जपलेली संवेदनशीलता याची पावती असल्याची भावना संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी व्यक्त केली आहे.