राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा जिल्हाध्यक्षपदी वरुण राजेश पारेख

0
4902

पालघर, दि. 11 नोव्हेंबर: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवा जिल्हा अध्यक्षपदावर वरुण राजेश पारेख यांची निवड करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते मुंबई येथे नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी विक्रमगडचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा व डहाणूचे नगरसेवक तन्मय बारी उपस्थित होते.

वरुण हे डहाणूचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते दिवंगत राजेश पारेख यांचे पुत्र आहेत. राजेश पारेख यांच्या तालमीत तयार झालेल्या वरुण यांनी पारेख कुटूंबाचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राजेश पारेख हे संपूर्ण हयातीत राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले होते. ते सुप्रिया सुळे यांच्या खास विश्वासातील नेतृत्व होते. राजेश पारेख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खूद्द श्री शरद पवार हे डहाणूत आले होते. त्यावेळी श्री पवार यांनी वरुण यांच्याशी संवाद साधल्यानंतर वरुणमध्ये असलेल्या नेतृत्वगुणांची श्री पवार यांनी पारख केली व त्यातून आज वरुण यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या निवडीमुळे पालघर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.