डहाणू, दि. 19 : माणूस म्हणून जगण्यासाठी भारतीय राज्यघटना समजून घेणे अत्यंतिक आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी डहाणू येथील रोटरी सभागृहात बोलताना केले. ते रोटरी क्लब ऑफ डहाणू व नूतन बाल शिक्षण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष राकेश सरवैया, सचिव संजय कर्णावट, डहाणू इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतिष पारेख, ज्येष्ठ रोटेरीयन शिक्षण पत्रिकेचे संपादक अशोक पाटील, रोटेरीयन फैय्याज खान, निमील गोहिल, डॉ. मोनिका मुळीक, नूतन बाल शिक्षण संघाचे सुधीर कामत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नूतन बाल शिक्षण संघाच्या कोसबाड (डहाणू) येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले जात असून वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यघटना, मूलभूत अधिकार व कर्तव्ये या विषयावर जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जोशी यांनी राज्यघटनेतील सर्व तपशील अतिशय सोप्या भाषेत विशद करुन सांगितला. राज्यघटनेने नागरिकांना जे अधिकार दिलेले आहेत ते समजून घेणे व त्याचबरोबर स्वतःच्या कर्तव्यांचे पालन केल्यास आपण देश समृद्ध करण्यास हातभार लावू शकतो असेही विचार जोशी यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटेरीयन अशोक पाटील यांनी संजीव जोशी यांचा मोजक्या शब्दात नेमका असा परिचय करुन दिला. तर राकेश सरवैया यांनी राज्यघटनेसारख्या अवघड विषयावर सतत 90 मिनिटे खिळवून ठेवल्याबद्दल जोशी यांचे कौतुक करुन असे आणखी कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली. तर संजय कर्णावट यांनी आभार प्रदर्शन केले.