मोहन राणे/राजतंत्र न्यूज नेटवर्क
विकासवाडी, दि. 16 : प्रत्येक नागरिकाने भारतीय राज्यघटना समजून घेतली पाहिजे. राज्यघटनेद्वारे प्राप्त मूलभूत अधिकार व कर्तव्ये समजून घेऊन सक्षम नागरिक बनावे आणि भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी हातभार लावावा, असे विचार ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी विकासवाडी येथे बोलताना व्यक्त केले. नूतन बाल शिक्षण संघ संचलित विकासवाडी अध्यापक विद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर, पदाधिकारी महेश कारिया, दिनेश पाटील, सुधीर कामत, विनायक बारी, उमाताई राऊत, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य संतोष लुले, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याद्यापिका मनिषा बारी यांसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. नूतन बाल शिक्षण संघाच्या डहाणू तालुक्यातील कोसबाड टेकडीवर पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांनी साकारलेल्या विकासवाडी प्रकल्पाचे हिरक महोत्सवी वर्ष चालू आहे. त्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
यावेळी बोलताना जोशी यांनी पद्मभूषण ताराबाई मोडक व पद्मश्री अनुताई वाघ यांनी शिक्षणाचा घटनात्मक हक्क मिळण्याच्या खूप आधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून शिक्षणाचा नैतिक अधिकार मान्य केला आणि आयुष्यभर त्यासाठी कार्य केले असे गौरवोद्गार काढून अशा विभूतींकडून प्रेरणा घेऊन आपण आपली नैतिक, कायदेशीर व घटनात्मक कर्तव्ये पार पाडली पाहिजेत असे प्रतिपादन केले.
संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर यांनी मार्गदर्शन करताना सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेची मागणी करणारे एम. एन. रॉय यांच्या विषयी तपशीलवार माहिती देऊन रॉय यांच्या पत्रकारितेची पार्श्वभूमी कथन केली. आपल्या अभ्यासपूर्ण व नेमकेपणाच्या शैलीतून पावस्कर यांनी आपण भारतीय प्रगत देशांच्या तुलनेत नैतिक कर्तव्यांचे पालन करण्यात उदासिनता दाखवित असल्याचे मत व्यक्त करुन स्वयंशिस्त बाळगण्याची मानसिकता वृद्धिंगत करण्याची आवश्यकता व्यक्त केली.