दि. 6 : डहाणू नगरपरिषदेचे कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान नगरसेवक सईद रशीद शेख यांना पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नरनावरे यांनी अपात्र ठरविले आहे. सईद आतापर्यंत 2 वेळा कॉंग्रेसच्या तिकिटावर डहाणू नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2012 च्या निवडणूकीत सईद निवडून आल्यानंतर त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेले उमेदवार नासिर इस्माईल खान यांनी सईद यांच्याविरोधात त्यांना 3 अपत्य असल्याच्या कारणाने अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती. साडेचार वर्षानंतर या याचिकेचा निकाल लागला असून याचिकाकर्त्याचा दावा मंजूर करुन जिल्हाधिकारी यांनी सईद यांना अपात्र घोषित केले.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आज डहाणू नगरपालिका कार्यालयाकडे आदेश प्राप्त झाल्यानंतर एकच खळबळ माजली. या आदेशामुळे सईद यांचे डहाणूरोड जनता सहकारी बँकेतील संचालकपद देखील धोक्यात आले आहे. दरम्यान सईद शेख या निकालाच्या विरोधात अपिलात जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काय आहे प्रकरण?
सईद शेख यांना तिन अपत्य झालेली असून त्यापैकी 2 अपत्ये हयात आहेत. 2 पेक्षा जास्त अपत्ये असलेल्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढविता येत नाही. मात्र सईद यांच्या हयात अपत्यांची संख्या 2 असून त्यांचे दुसरे अपत्य अपघातात मयत झाल्यानंतर तिसरे अपत्य जन्माला आल्यामुळे सईद यांच्या विरोधातील याचिकेवर नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.