
राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 3 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन विविध वाहनांतून आलेल्या या दरोडेखोरांकडून गावठी कट्ट्यासह अनेक घातक हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

वालीव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास चौगुले यांना महामार्गावरील वसई हद्दीतील सातिवली ब्रिजच्या बाजुला असलेल्या सागर पेट्रोल पंपावर 1 मे रोजी रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चौगुले यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांची स्वतंत्र पथके तयार करुन सदर पेट्रोल पंपाच्या भोवती सापळा रचला असता रात्री 11.30 च्या सुमारास एका इनोव्हा कारमधुन दोघे, एका वेगनार कारमधुन दोघे व एका रिक्षातून तिघे असे एकुण 7 संशयीत इसम पेट्रोल पंप परिसरात पोहोचल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या दरोड्याची माहिती देणारा खबर्या देखील यावेळी पोलिसांसोबत असल्याने त्याने दरोडेखोरांची ओळख पटवताच पोलिसांच्या पथकाने सातही जणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन सातही जणांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता श्रावण लालबहादुर यादव (वय 30, रा. कांदिवली, मुंबई), प्रविण शुकसागर वर्मा (वय 29), गोविंदलाल शुकसागर वर्मा (वय 33, दोघे रा. गोवंडी, मुंबई), मल्लीनाथ श्रीमंत डीगी (वय 40), रणजित रामसिंग ठाकुर (वय 43), नागराज लक्ष्मण गौडा (वय 43), सतीष अशोक झांबरे (वय 27, चौघे रा. भिवंडी, ठाणे) अशी सदर दरोडेखोरांची नावे असल्याचे समोर आले.
या सर्वांची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी कट्टा व दोन राऊंड, लोखंडी सुरा, नायलॉनची दोरी, कटर, लोखंडी पक्कड, हातोडी, छन्नी, स्क्रु ड्रायव्हर, बांबुची काठी, लाकडी काठी अशी हत्यारे आढळून आली.
दरम्यान, पोलिसांनी सदर हत्यारे व वाहनांसह एकुण 16 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सातही आरोपींना अटक केली असुन त्यांच्याविरोधात वालीव पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. वालीव पोलिसांकडून त्यांची कसुन चौकशी सुरु असुन त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.