अटकेतील पत्रकारांना जामीन

0
1685
LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
            पालघर, दि. २५ : सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आज तक वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी हुसेन खान आणि हिंदुस्तान टाईम्सचे प्रतिनिधी राम परमार यांना आज पालघर येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पालघर पोलीसांनी वाघोबा खिंडीत केलेल्या गोळीबाराचे वृत्त घेण्यासाठी हे पत्रकार पालघर पोलीस स्टेशनला गेले होते. आज त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करुन उद्या (२६) पत्रकारांची ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे.
           गुरुवारी (दि.२१) रात्री पालघर मनोर दरम्यानच्या रस्त्यावर वाघोबा खिंडीत वाहनांवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. दगडफेक करणाऱ्या आरोपीच्या शोधात गेलेले पालघर पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी संशयीतांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. आरोपींनी पोलीसांवर गोळीबार केल्यामुळे प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याचा दावा पोलीस करीत असताना पोलीसांनी निरपराध आदिवासींवर गोळीबार केल्याचा आरोप होत असल्याने वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी हुसेन खान आणि राम परमार हे पत्रकार पोलीस स्टेशनला गेले होते.
मात्र ह्यावेळी पोलीस उप निरीक्षक सय्यद यांनी हुसेन यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्या पाठोपाठ पोहोचलेल्या राम परमार यांनी हा प्रकार पाहून सय्यद यांच्या बेकायदेशीर वागणूकीबाबत नापसंती व्यक्त केली आणि याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी राम यांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली. तसेच त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. दोन्ही पत्रकारांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आज या प्रकरणी सुनावणी झाली असता न्यायालयाने दोन्ही पत्रकारांना जामीन मंजूर केला आहे. कागदोपत्री सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर उद्या (दि. २६) या पत्रकारांची ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे.