
डहाणू, दि. २६ : पालघर तालुक्यातील माहीम येथील कृषीभूषण शेतकरी व बागायतदार अनंत नाना राऊत, वय ८६, यांचे २३ जून रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
राऊत तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक शासकीय योजना आपल्या भागात आणून विविध पिके घेण्याचे प्रयोग केले. त्यांनी पालघर तालुक्यात प्रयोग परिवार नावाची संस्थाही स्थापन केली. केरळची मक्तेदारी असलेली दालचीनी, लवंग, कोको तसेच जायफळ आदी मसाल्यांच्या पिकांसह व्हॅनिलाचे पिक त्यांनी आपल्या शेतात घेतले. त्यांचा उत्साह तरुणांनाही लाजवेल असा होता. विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणा-या शिबिरांमध्ये उपस्थित राहून शेतक-यांना मार्गदर्शक करत असत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने कृषि भूषण पुरस्कार ने सन्मानित केले होते. राऊत यांनी आपल्या कृषि क्षेत्रातील कार्याने माहीम गावाला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. कृषी क्षेत्रातील एक चांगला मार्गदर्शक हरपला म्हणून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते