दि. 31 ऑगस्ट : डहाणू नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवून नगरसेवक झालेल्या मिहीर शहा व अन्य 2 नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्रतेची कारवाई व्हावी याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सक्षम प्राधिकरणाकडे याचिका दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालघर जिल्ह्यातील नेते आमदार आनंद ठाकूर यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा यांच्यासह प्रकाश माच्छी व प्रकाश बुजड या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार ठाकूर यांनी ही भूमिका मांडली.
तथापि मिहीर शहा व प्रकाश माच्छी यांनी आधी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतरच पक्षांतर केले असल्याची माहिती मिहीर शहा यांनी राजतंत्रला दिली असून तसा अर्ज दिल्याची पोच देखील सादर केली आहे. असे असले तरी मिहीर शहा यांचे सदस्यत्व अजून तांत्रीकदृष्टीने संपूष्टात आलेले नाही. टपालात अर्ज दाखल करुन ते रद्द करता येत नाही. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांच्या समक्ष राजीनामा सादर केल्यानंतरच सदस्यत्व संपुष्टात येईल. मिहीर शहा यांनी याआधी गटनेते पदाचा अशाच पद्धतीने राजीनामा दिल्यामुळे तो स्वीकृत झाला नाही. प्रकाश बुजड यांनी देखील 1 वर्षापूर्वीच अशाच पद्धतीने टपालाद्वारे राजीनामा दिलेला असल्याने तो स्वीकृत झालेला नव्हता.