दि. 22 ऑक्टोबर: डहाणूरोड जनता सहकारी बॅन्केच्या अध्यक्षपदावर अपेक्षेप्रमाणे मिहीर शहा यांची बिनविरोध निवड झाली आहे. भावेश देसाई हे बॅंकेचे नवे उपाध्यक्ष झाले आहेत. बॅंकेचे अध्यक्ष राजेश पारेख यांच्या निधनामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. तर उपाध्यक्ष ॲड. रमेश नहार यांनी राजीनामा देऊन संचालकपदाचे कामकाज करणे थांबवले होते. आज जिल्हा उप निबंधक कार्यालयाने दोन्ही पदांच्या निवडीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला होता. मात्र अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे शहा व देसाई यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. मिहीर शहा हे डहाणूचे माजी नगराध्यक्ष असून विद्यमान नगरसेवक आहेत.
मिहीर शहांना रोखण्याचे शेवटचे प्रयत्न असफल
ॲड. रमेश नहार हे सुरुवातीपासून बॅंकेचे अध्यक्ष होण्यास इच्छुक होते. त्यांचे पुत्र डॉ. अमित यांनी सुरुवातीपासूनच दबावतंत्राचा वापर केला होता व त्यातून उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले होते. मात्र सततचे दबावतंत्र पुढे प्रभावहिन ठरले. काल भावेश देसाई यांना अध्यक्षपदाची ऑफर देऊन उपाध्यक्षपद राखण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र आकड्यांचे गणित मिहीर शहा यांच्या बाजूने असल्यामुळे अखेर मिहीर शहा हेच बॅंकेचे अध्यक्ष झाले.