mahanews Media (दिनांक 24 जून 2021) : कोरोनासंदर्भातील शासकीय आकडेवारी पहाता येत्या 28 जून पासून पुढील आठवड्यासाठी पालघर जिल्हा स्तर 1 मध्ये येण्याची शक्यता निर्माण झाली असून, तसे झाल्यास जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राज्यात ऑक्सिजन बेडचा वापर व पॉझिटीव्हिटी दर लक्षात घेऊन जिल्ह्यांची 5 स्तरात विभागणी करण्यात येते व स्तरानुसार निर्बंध लादले जातात.
18 जून ते 24 जून 2021 दरम्यानची आकडेवारी तपासली असता ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 172 ने कमी झाली असून मृत्यूची संख्या 50 ने वाढली आहे. 18 जून रोजी जिल्ह्यातील एकूण कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2,210 होती ती 24 जून रोजी 2,038 झाली असून एकूण मृत्यूचा आकडा मात्र 2,467 वरुन 2,514 वर गेला आहे.
कोरोना पॉझिटीव्हिटी दर 3.46% (5% पेक्षा कमी): 18 जून रोजी पर्यंत जिल्ह्यातील 7 लक्ष 89 हजार 899 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील 1 लक्ष 14 हजार 584 लोकांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. 24 जून रोजी पर्यंत जिल्ह्यातील 8 लक्ष 19 हजार 835 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील 1 लक्ष 15 हजार 621 लोकांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. 18 ते 24 जून दरम्यान स्वॅब घेतलेल्या 29 हजार 936 लोकांपैकी 1 हजार 37 लोकांचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. हा दर अवघा 3.46% इतका असून उद्या (25 जून) रोजी जाहीर होणाऱ्या आकडेवारीत असाच दर राहिल्यास पालघर जिल्हा स्तर 1 मध्ये सामील होऊन सर्व निर्बंध हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.