पालघर, दि. 5 : पालघर जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना चिकू या पिकांसाठी राबविण्यात येत असून हा विमा काढलेल्या जिल्ह्यातील 4,361 शेतकर्यांपैकी 4057 शेतकर्यांना एकुण 11 कोटी 44 लाख 25 हजार रुपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा कृषि अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी दिली आहे.
सन 2016 च्या खरीप हंगामापासून चिकू फळपिकासाठी हवामानावर आधारीत फळपिकविमा राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. महावेध प्रकल्पाअंतर्गत संबंधित महसुल मंडळात उभारणी केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदविलेली हवामानाची प्रमाणित आकडेवारी ग्राह्य धरण्यात येते. विमा संरक्षण कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग पाच दिवस 90 टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास व प्रति 20 मिमी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सदर 4 दिवस झाल्यास 27 हजार रुपये, तर सापेक्ष आर्द्रता सलग दहा दिवस 90 टक्के पेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन 20 मि.मि. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग 8 दिवस झाल्यास 60 हजार रुपयांची रक्कम नुकसान भरपाईपोटी देण्यात येते. दरम्यान, फळपिकांना प्रतिकुल हवामान घटकांपासून विमा संरक्षण देणे आवश्यक असल्याने सन 2020 मध्ये मृगबहाराकरीता फळपिक विमा योजना लागू करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये पालघर जिल्ह्यातील एकूण 4,361 शेतकर्यांनी 3939.73 हेक्टर क्षेत्राकरीता 1 कोटी 8 लाख 34 हजार रुपयांचा विमा काढला आहे व त्याची विमा संरक्षित रक्कम 21 कोटी 66 लाख 85 हजार रुपये आहे. त्यापैकी 4057 शेतकर्यांना 3658.12 हेक्टर क्षेत्रासाठी तालुका व महसुल मंडळनिहाय एकूण 11 कोटी 44 लाख 25 हजार रकमेचा लाभ मिळाला आहे, असे तरकसे यांनी सांगितले.