
राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 14 : आमचा गाव आमचा विकास या संकल्पने अंतर्गत गावाच्या विकासासाठी 2020-25 पंधरावा वित्त आयोग लागू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या काळात पालघर जिल्ह्यातील 473 ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. 10 नोव्हेंबर पासून केळवे रोड, वाकसई, परनाळी, मायखोप, कपासे, माकुणसार, आगरवाडी, नगावे, विराथन खुर्द, दांडा खटाळी, अर्नाळा, टेंभी व इतर अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा संपन्न झाल्या असून 10 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात येतील.

केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभाग व पंचायती राज मंत्रालयाकडून सबकी योजना सबका विकास लोकसहभागातून जनतेचा ग्रामपंचायत विकास आराखडा मोहीम राबविन्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्य शासनाच्या विविध विभागांचा सहभाग, विविध विभागांमार्फत ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विकास योजनांचे अभिसरण करून सन 2020-21 चा ग्रामपंचायत वार्षिक विकास आराखडा तयार करायचा आहे. पुढील आर्थिक वर्षापासून पंधरावा वित्त आयोग लागू होणार असून आराखडे तयार करणे ही त्याची पूर्वतयारी आहे.
यापूर्वी चौदाव्या वित्त आयोगाच्या वेळेसही 2015 – 2020 साली पंचवार्षिक आराखडे तयार करण्यात आले होते. या आराखड्यातील काही कामे अद्यापही अपूर्ण आहेत. उर्वरित कामासह गावाच्या आणखी गरजा, आवश्यकता, गावाचे पुढील नियोजन विचारात घेऊन ग्राम सभेमार्फत पुढील नियोजन तयार करण्यात येणार आहे. गावातील विविध घटकांशी विचार विनिमय करून, त्यांच्या गरजा व मागण्या लक्षात घेत, सुचवलेली कामे व उपक्रमे प्राधान्यक्रमाने ग्रामसभेत ठरवण्यात येतील. यामुळे ग्रामपंचायतीला पुढील पाच वर्षात मिळणारा अपेक्षित निधी गृहीत धरून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतींचे विकास आराखडे तयार करत असताना 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून शासनाने काही विकासकामांसाठी निधी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आरोग्य, शिक्षण व उपजीविकेच्या कामांसाठी एकूण निधीपैकी 25% निधी राखीव असेल. तसेच महिला व बालकल्याण साठी 10% तर मागासवर्गीय समाजासाठी त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणात निधी राखीव ठेवावा लागणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामसभा सुरु आहेत.