
प्रतिनिधी/वाडा, दि. 29 : तालुक्यातील कोनसई गावाच्या हद्दीतील इको ग्रीन या कंपनीत रासायनिक प्रक्रियेदरम्यान तयार झालेले सांडपाणी बिनदिक्कत कंपनीच्या शेजारी असलेल्या शेतात सोडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असुन यामुळे येथील शेतकर्याच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

कोनसई गावातील रामचंद्र मोकाशी हे परंपरागत दुग्ध व्यवसाय करुन व थोड्याफार शेती उत्पन्नाने आपल्या कुटुंबाचा उदर्निर्वाह करतात. वाहनांच्या वापरलेल्या टायरवर प्रक्रिया करुन त्यापासुन विविध उत्पादन घेणार्या इको ग्रीन या कंपनी लगतच मोकाशींची शेती असुन त्यांच्या उभ्या लागवडीत कंपनीतून हे दूषित द्रव्य सांडपाण्याच्या स्वरुपात सोडले जात असल्याने लगतची सर्वच शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे आधीच न परवडणार्या शेतीने मनोबल खचलेला शेतकरी यांसारख्या समस्यांना लढा देताना बेजार झाला आहे. एवढेच नव्हे तर कंपनीत टायर जाळण्याच्या प्रक्रियेनंतर कंपनीतून निघणारा दूषित वायू खुपच दुर्गंधीयुक्त असुन त्याचा परिसरात पसरणारा उग्र वास श्वसनक्रियेस अतिशय घातक ठरत आहे. अर्थातच प्रदूषण नियमांची पायमल्ली करुन कंपनीकडून उत्पादन घेतले जात आहे.
त्यामुळे या प्रकाराची संबंधितांनी तात्काळ दखल घेऊन कंपनीवर कारवाई करून बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी वाडा तहसील कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.