राजतंत्र मिडीयापालघर, दि. २७: कोर्टात आरोपीच्या विरोधात कमजोर युक्तिवाद करुन अनैतिकरित्या साहाय्यभूत भूमिका घेणाऱ्या सरकारी वकिलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली आहे. दिनेश संतोष पाटील असे या वकिलाचे नाव आहे.
दिनेश हा पालघर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सरकारी वकिल म्हणून काम पहात होता. मनोर (पालघर तालुका) येथे रहाणाऱ्या एका इसमाच्या विरोधात या न्यायालयात विनयभंगाच्या आरोपाखाली खटला सुरु होता. खटल्यामध्ये सरकारतर्फे कमजोर युक्तिवाद करुन निर्दोष सुटण्यास साहाय्यभूत भूमिका घेण्यासाठी दिनेशने संबंधीत इसमाकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. या खटल्यात आरोपी असलेल्या इसमाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर शाखेकडे तक्रार केली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ फेब्रुवारी रोजी खातरजमा करुन आज ६ हजार रुपये लाच घेताना दिनेशला रंगेहाथ पकडले असून लगेचच अटक करण्यात आली आहे.