गडचिंचले साधू हत्याकांड : 90 आरोपींच्या जामीन याचिकेवर 16 जानेवारीला निर्णय

0
2906

डहाणू, दि. 7 : डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथील साधू हत्याकांडाप्रकरणी अटेकत असलेल्या 165 पैकी 90 आरोपींच्या जामीन याचिकांवर येत्या 16 जानेवारी रोजी निर्णय घेतला जाणार आहे. ठाणे येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधिश एस. बी. बहालकर यांनी काल, बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या जवळपास डजनभर जामीन याचिकांवर विशेष सरकारी वकील सतीश मानशिंदे आणि आरोपींचे वकील अमृत अधिकारी व अतुल पाटील यांचा युक्तीवाद ऐकला.

मानेशिंदे यांनी युक्तीवाद करताना, याचिकाकर्ते घटनेदरम्यान घटनास्थळावर उपस्थित होते. मात्र त्यांचा गुन्ह्यात कोणाताही सक्रिय सहभाग नसल्याचे न्यायालयाला सांगितले. तर पोलिसांनी केवळ संशय व मोबाईल टॉवरच्या लोकेशनच्या आधारावर याचिकाकर्त्यांना अटक केली असल्याचा युक्तीवाद केला. दरम्यान, आरोपींनी एकाच घटनेबाबत तीन वेगवेगळ्या एफआयआर नोंदवण्याच्या वैधतेलाही आव्हान दिले आहे. या संपूर्ण युक्तीवादानंतर, आता 16 जानेवारी रोजी सदर 90 जणांच्या जामीन याचिकांवर सुनावणी होणार आहे.

लॉकडाऊन कालावधीत पसरलेल्या एका अफवेतून 16 एप्रिल 2020 रोजी 2 साधू मारुती इको व्हॅनमधून त्यांच्या गुरुच्या अंत्यसंस्कारासाठी गुजरात राज्यात जात असताना गडचिंचले येथे जमावाने त्यांना रोखून अमानुषपणे मारहाण केली होती. घटनास्थळी पोलिस आल्यानंतरही पोलिसांच्या ताब्यातील दोन साधू व त्यांचा चालक अशा 3 जणांची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.