mahanews MEDIA
दिनांक ८ मार्च, २०१८: आता स्वतःला बिचारी समजणे सोभारतीय राज्यघटनेने महिलांना दिलेला समानतेचा हक्क आणि महिलांचे घटनात्मक व कायदेशीर अधिकार स्त्रियांनी समजून घेतले पाहिजेत. आता स्वतःला बिचारे समजणे सोडून दिले पाहिजे. क्रान्तिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करताना त्यांनी दिलेला संदेश समजून घेतला पाहिजे. स्त्री पुरुषांपेक्षा कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. फक्त याबाबतची जाणीव स्त्रीला स्वतःला करून घ्यावी लागेल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने स्त्री समानतेचे युग अवतरेल असे विचार दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी जामशेत येथे बोलताना काढले. ते जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील (वसंतवाडी) जामशेत शाळेत आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक श्री बरफ, सहशिक्षिका सौ. राजश्री जाधव उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वसंतवाडी शाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी कुंकू अशा भरघोस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी संवाद साधताना संजीव जोशी यांनी ११० वर्षांपासून चालत आलेली जागतिक महिला दिनाची परंपरा, इंग्लंडमध्ये महिलांना १९१८ मध्ये मिळालेला मतदानाचा अधिकार, त्यानंतर १९२० मध्ये अमेरिकेत महिलांना मिळालेला अधिकार, आपल्या भारत देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच मिळालेला सर्वंकष असा समानतेचा अधिकार याबाबत आढावा घेतला. सावित्रीबाई फुले व अशा अनेक थोर महिलांनी दिलेल्या दिशेने चालल्यास स्त्री समानता दूर नाही. मात्र त्यासाठी भगिनींनी स्वतःच्या अधिकाराविषयी जागृत राहिले पाहिजे असे विचार जोशी यांनी यावेळी मांडले.